Ad will apear here
Next
करोना विषाणू : ‘हे’ शास्त्रीय मुद्दे तुम्हाला माहिती आहेत का?
सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रीव्हेंशन (सीडीसी) या अमेरिकेतील संस्थेने तयार केलेले करोना विषाणूची रचना दर्शविणारे चित्र

करोना विषाणूमुळे सध्या जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या आजारामुळे भीतीचे वातावरण आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोविड-१९ (COVID-19) असे त्याचे नामकरण केले असून, जगभर त्याची साथ असल्याचे (पँडेमिक) जाहीर केले आहे. ही परिस्थिती काळजी वाटण्यासारखी आहे; मात्र सोशल मीडियासह अनेक माध्यमांतून ऐकीव किंवा अशास्त्रीय माहितीचा प्रसार होत असल्याने नेमका विश्वास कशावर ठेवायचा, असा संभ्रम निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर, जागतिक आरोग्य संघटनेकडून प्रसारित करण्यात आलेली ही शास्त्रीय माहिती सोप्या भाषेत येथे देत आहोत...
.............. 
- कोविड-१९ (COVID-19) काय आहे?
कोविड-१९ ही करोनाव्हायरस या विषाणू गटातील नवीन स्ट्रेन आहे. डिसेंबर २०१९मध्ये चीनमधील वूहान येथे तो पहिल्यांदा प्राण्यांमधून माणसांमध्ये आला. सार्स, मर्स (SARS, MERS) हे करोना विषाणू गटातील अन्य आजार आहेत.  

- ‘कोविड-१९’च्या संसर्गाची लक्षणे :
- ताप, सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे ही सामान्य लक्षणे आहेत.

- पण रोगाची तीव्रता वाढली, की न्यूमोनिया, श्वसन यंत्रणा निकामी होणे (रेस्पिरेटरी फेल्युअर) ही लक्षणे दिसतात.

- लक्षणे तीव्र झाली, तर मृत्यूही होऊ शकतो. तथापि बरेच रुग्ण सामान्य लक्षणांवरील उपचारांनी बरे होतात. वृद्ध, आणि इतर आजार (उदा. मधुमेह इत्यादी) असणाऱ्या रुग्णांना हा आजार तीव्र होऊन न्यूमोनिया इत्यादी होण्याचा धोका असतो.

‘कोविड-१९’कसा पसरतो?
- हा विषाणू ड्रॉपलेट इन्फेक्शन म्हणजेच बाधित व्यक्तीच्या नाक, तोंडातून येणाऱ्या थुंकीच्या कणांमधून पसरतो.

- एखादी निरोगी व्यक्ती ‘कोविड-१९’ बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यानंतर लक्षणे दिसण्यास लागणारा वेळ (इन्क्युबेशन पीरियड) किती असतो?
- त्यासाठी तीन ते २१ दिवस लागू शकतात. साधारण पाच दिवस लागतातच. म्हणूनच एखादी व्यक्ती बाधित प्रदेशातून आल्यानंतर १४ दिवस तिला बाहेरच्या लोकांशी संपर्क टाळण्यास सांगितले जात आहे, जेणेकरून संबंधित व्यक्तीलाही लागण झाली असल्यास लक्षणे दिसू लागतील आणि त्या कालावधीत त्या व्यक्तीकडून दुसऱ्या कोणाकडे हा आजार पसरवला जाणार नाही.

‘कोविड-१९’चे निदान कसे केले जाते?
- रुग्णाच्या थुंकीचा, घशाच्या स्रावाचा किंवा रक्ताचा नमुना घेऊन rt-PCR ही तपासणी केली जाते. ती पॉझिटिव्ह आल्यास ‘कोविड-१९’ची बाधा झाल्याचे निदान होते. महाराष्ट्रात ही चाचणी, पुणे, मुंबई, नागपूर येथील सरकारी संस्थांमध्ये केली जाते.



‘कोविड-१९’चा संसर्ग टाळण्यासाठी काय करावे?
- नियमितपणे साबणाने हात धुवावेत किंवा सॅनिटायझर वापरावा.

- सर्दी, खोकला अशी लक्षणे असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीपासून तीन फूट अंतर राखावे.

- खोकताना, शिंकताना तोंड आणि नाक व्यवस्थित झाकून घ्यावे.

- फ्लूसारखी लक्षणे असणाऱ्या व्यक्तीशी संपर्क आलाच, तर नाक, तोंड, डोळे या भागाला हात स्वच्छ धुतल्याशिवाय लावू नयेत.

- स्वतःला फ्लूसारखी सर्दी, खोकला, ताप  इत्यादी लक्षणे दिसल्यास पूर्ण बरे होईपर्यंत लोकांत मिसळू नये. (सेल्फ आयसोलेशन).

‘कोविड-१९’ची लक्षणे दिसल्यास काय करावे?
- सामान्य फ्लूची लक्षणे असतील तर ती साधारण औषधांनी कमी होतात. लक्षणे वाढली किंवा श्वास घेण्यास त्रास होणे, बाधित व्यक्तीशी संपर्क, बाधित भागातून प्रवास केला असेल तर ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा. स्वतः व घरातील इतर लोकांनी बाहेरच्या लोकांशी संपर्क टाळावा. (सेल्फ आयसोलेशन)

‘कोविड-१९’बद्दल आणखी काही मुद्दे...
- या आजारावर कोणतेही औषध अथवा लस सध्या तरी उपलब्ध नाही. प्रतिबंध हाच उपाय आहे.

- हा आजार पसरण्याचा वेग जास्त असला, तरी मृत्युदर SARS (१०%) किंवा MERS (३४%) या करोना विषाणूंच्या मागच्या साथीपेक्षा कमी आहे. ‘कोविड-१९’चा संसर्ग झालेल्या व्यक्तींचा मृत्युदर ३.४ टक्के इतका  आहे. म्हणजे हा आजार झाल्याचे निदान झालेल्या १०० व्यक्तींमागे साधारण तीन ते चार व्यक्तींचा मृत्यू होतो. 

- वृद्ध लोक व मधुमेहासारखे इतर आजार असणाऱ्या लोकांमध्ये (म्हणजेच प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींना) हा आजार गंभीर होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे काळजी घ्यावी; पण भीती, अस्वस्थता (पॅनिक होणे) टाळावी.

- सर्जिकल मास्क फक्त फ्लूसारखी लक्षणे असणाऱ्या लोकांनी वापरावेत. त्यामुळे त्यांच्या थुंकीचे कण हवेत पसरत नाहीत. N-95 मास्क आरोग्यसेवक, नर्स, डॉक्टर यांसाठीच राखून ठेवावेत. हे मास्क बाहेरून येणारे बहुतेक कण मास्क घातलेल्या व्यक्तीच्या नाका-तोंडात जाऊ देत नाहीत. कारण आरोग्य सेवक, डॉक्टर आदींचा बाधित व्यक्तीशी संपर्क होण्याचे प्रमाण जास्त असते आणि त्यातून विषाणू जास्त प्रमाणात त्यांच्या शरीरात जाण्याची शक्यता असते. निरोगी, सामान्य व्यक्तींनी मास्क वापरण्याची गरज नाही. त्यामुळे हे मास्क रुग्ण आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना उपलब्ध होतील. 

- या आजाराची ताजी शास्त्रशुद्ध माहिती मिळवण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेसारख्या अधिकृत स्रोतांचा उपयोग करावा. 

हे अत्यंत महत्त्वाचे
- परदेश प्रवास, बाधित लोकांचा संपर्क आदींची माहिती आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांच्यापासून लपवून ठेवू नये. 

- साथ रोखण्यासाठी प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या उपायांना सहकार्य करावे.

- कोणत्याही अशास्त्रीय दाव्यांवर, अफवांवर विश्वास ठेवू नये.

- प्रतिबंधक काळजी घ्यावी, माहिती मिळवावीच पण उगाचच घाबरून जाऊ नये. 

- करोना विषाणूचा आजार बरे करणारे किंवा संसर्ग टाळणारे कोणतेही आयुर्वेदिक किंवा कसलेच औषध सध्या उपलब्ध नाही. तुळस, लसूण, आले, मिरे, निलगिरी तेल ते गोमूत्र यापैकी किंवा इतर कोणतेही आयुर्वेदिक किंवा अन्य पॅथीतील औषध करोना संसर्गाला बरे करत असल्याचा कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. त्यामुळे व्हॉट्सअॅपवर किंवा सोशल मीडियावर येणाऱ्या अशा अशास्त्रीय माहितीवर विश्वास ठेवू नये. प्रतिबंधक लस विकसित करण्याचे काम सध्या विविध संस्थांमध्ये सुरू असून, ती विकसित होऊन, चाचण्या होऊन, प्रत्यक्ष माणसांवर वापर करण्यासाठी मान्यता मिळेपर्यंत दोन वर्षांचा कालावधीही लागू शकतो, असे यंत्रणांकडून जाहीर करण्यात आले आहे, ही बाब लक्षात घ्यावी. त्यामुळे अस्वस्थ न होता प्रतिबंधात्मक काळजी घेणे आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणे हेच सध्या करण्याजोगे उपाय आहेत, हे लक्षात घ्यावे.

- डॉ. तृप्ती प्रभुणे, पुणे

(माहिती संदर्भ : https://www.who.int/, https://www.cdc.gov/)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZSZCK
Similar Posts
करोना : शरीराची प्रतिकारशक्ती कशी वाढवायची? आहार, जीवनशैली कशी हवी? सुबह जैन-सराफ यांचा व्हिडिओ सध्या करोना विषाणूच्या संसर्गाने थैमान घातले आहे. त्यावर अजून तरी कोणतीही लस किंवा औषध नाही. या पार्श्वभूमीवर, शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी नेमकं काय करायचं, आहार, जीवनशैली कशी हवी, याबद्दल सात्विक मूव्हमेंटच्या सुबह जैन-सराफ यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा हा व्हिडिओ...
करोना विषाणू : जगातील ५० टक्क्यांहून अधिक रुग्ण बरे झाले.. करोना विषाणूचा फैलाव झाल्यामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे; पण घाबरून न जाता प्रतिबंधात्मक काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. जगभरात या विषाणूची लागण झालेल्यापैकी ५०.७ टक्के रुग्ण यातून बरे झाले आहेत, असे जॉन हॉपकिन्स विद्यापीठाची आकडेवारी सांगते. तसेच, जगभरात या विषाणूची लागण झालेल्यापैकी ८०.९ टक्के रुग्णांची लक्षणे सौम्य आहेत
आयुर्वेदाच्या साह्याने वाढवा करोनाविरुद्ध प्रतिकारशक्ती! सद्यस्थितीत करोनाची भीती प्रत्येकाच्या मनात घर करून आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव व त्यासाठी अपुरी पडणारी वैद्यकीय यंत्रणा यामुळे स्वतः निरोगी राहण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणे, याव्यतिरिक्त सामान्य माणसाच्या हातात काहीही नाही. या परिस्थितीत पथ्यपालन व स्वत:ची प्रतिकारशक्ती वाढविणे हे दोनच प्रकार शक्य आहेत
हात निर्जंतुक करण्याची गरज सर्वप्रथम ओळखणारे डॉ. इग्नाझ सिमेलविस : गुगल डूडलला अॅनिमेटेड व्हिडिओ करोना विषाणूने जगभर थैमान घातले असल्यामुळे सध्या हात स्वच्छ धुण्याचे महत्त्व प्रत्येक माध्यमातून सांगितले जात आहे. आधुनिक जगात रोगप्रसाराला प्रतिबंध करण्यासाठी हात निर्जंतुक करण्याचे महत्त्व सर्वप्रथम कोणी ओळखले असेल, तर ते होते हंगेरीचे डॉ. इग्नाझ सिमेलविस. हात धुण्याचे वैद्यकीय महत्त्व सर्वप्रथम ओळखणारी व्यक्ती असल्याचे श्रेय त्यांना दिले जाते

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language